नवी दिल्ली - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या लसीचा शरिरावर विपरित परिणाम झाल्याचा दावा चेन्नईतील एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने केला आहे. लसीच्या तीसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी या व्यक्तीने आपले नाव दिले होते. तामिळनाडूतील श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्यूकेशन अॅन्ड रिसर्च (SRIHER) या संस्थेत त्याला लसीचा डोस देण्यात आला होता. या स्वयंसेवकाने आता सीरमकडे ५ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
चेतासंस्थेवर विपरित परिणाम झाला
लसीचा विपरित परिणाम झाल्याचा दावा ४० वर्षीय व्यावसायिक सल्लागाराने केला आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. लस दिल्यामुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिकदृष्या विपरित परिणाम झाल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. १ ऑक्टोबर रोजी त्याला लसीचा डोस देण्यात आला होता.
कंपनी आणि सरकारी संस्थांना कायदेशीर नोटीस
वकीलाद्वारे या व्यक्तीने आता सीरमसह लस निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांना नोटीस धाडली आहे. औषध महानियंत्रक, केंद्रीय औषध नियंत्रक संस्था, मुख्य कार्यकारी अधिकारी अस्त्राझेनेका इंग्लड, लसीचे मुख्य तपासनिक प्राध्यापक अॅन्ड्यू पोलार्ड, श्री रामचंद्र हायर एज्यूकेशन संस्थेचे कूलगुरू या सर्वांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. पाच कोटींची नुकसान भरपाई त्याने मागितली असून त्याच्या दाव्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोण करणार तपास ?
भारताचे औषध महानियंत्रक कार्यालय आणि संस्थात्मक निती समिती या दाव्यांची चौकशी करणार आहे. लस दिल्यानंतर या व्यक्तीच्या शरिरावर काही विपरित परिणाम झाले की नाही, याचा अधिकाऱ्यांचे पथक शोध घेणार आहे. त्यानंतरच यातील सत्य बाहेर येणार आहे. सीरम कंपनी अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाशी मिळून कोरोनावरती लस तयार करत आहे. अद्याप लस तयार झाली नसून विकासाच्या शेवटच्या टप्प्यात आहे.