नवी दिल्ली: दसऱ्याच्या आधिच अनेक भागातील पाऊस संपतो पण सध्या भारतातील अनेक भागात मान्सून जोरात आहे. यातच आता नोरू चक्रीवादळामुळे मान्सूनचा मुक्काम लांबत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नैऋत्य मान्सून सक्रिय झाल्यामुळे अनेक राज्यांत अजूनही पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. नोरु वादळाचा परिणाम भारताच्या हवामानावर दिसत आहे.
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुपर चक्रीवादळ नोरूमुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक भागात हवामानात बदल झाला आहे. सध्या देशातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, बिहारसह अनेक शेजारील राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतचे हवामान : नोरू वादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे थंड वारे वाहत असून ओलावा मिळाल्याने पाऊस पडत आहे. हा ट्रेंड ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता स्कायमेट या वेबसाइटने व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होऊन चक्रीवादळ बनले आहे. हे वादळ छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमार्गे उत्तराखंडपर्यंत पसरत आहे.
हलका ते मध्यम पावसाची शक्यता : पुढील २४ तासांत ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, मध्य प्रदेशचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने दिली आहे. तसेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या वरच्या भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि लगतच्या भागात पावसाची शक्यता आहे.