नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ८० दिवस झाले आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून अद्याप तोडगा निघाला नाही. लवकर तोडगा निघण्याची शक्यताही धुसर झाली आहे. दरम्यान, सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलकांची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर संख्या रोडावली -
शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी आंदोलनाचा उत्साह तसाच आहे. लंगरसह शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा पहिल्यासारख्याच सुरू आहेत. त्यात कोणतीही कमी झालेली नाही. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर अनेक लहान संघटनांनी आंदोलनातून माघारी घेतली. त्यामुळे सीमेवरील शेतकऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. यातच उन्हाचा कडाका वाढू लागल्याने खुल्या वातावरणात शेतकऱ्यांना ऊन असह्य होऊ लागले आहे.
आंदोलनाचा जोर पहिल्यासारखाचा - शेतकरी नेते
सिंघू सीमा ही शेतकरी आंदोलनाचे प्रमुख केंद्र आहे. पहिले दोन महिने सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र, यातील अनेक जण आता घरी गेले आहेत. ट्रॅक्टरची संख्याही कमी झाली आहे. पंजाब, हरयाणासह विविध भागात शेतकरी महापंचायत आयोजित करण्यात येत आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी शेतकरी जात असल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. आंदोलनाचा जोर पहिल्यासारखाच असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे.
हेही वाचा- कालव्यात कोसळलेल्या बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 40वर