नवी दिल्ली Corona Virus : देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा पसरताना दिसतोय. केरळ आणि महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही कोरोनाचा नवीन उपप्रकार JN1 चा रुग्ण आढळला. दुसरीकडं, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ८ महिन्यानंतर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. इथं एका भाजपा नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली. या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याचा दुबईच्या प्रवासाचा इतिहास आहे.
चंदीगडमध्ये मास्क परतले : कोरोनाचा नवा प्रकार पाहता चंदीगड प्रशासनानं बुधवारी मोठा निर्णय घेतला. चंदीगडमध्ये मास्क परतले आहेत. लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकानांही मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. चंदीगड प्रशासनानं या सूचना जारी केल्या.
कर्नाटकात एकाचा मृत्यू : बुधवारी देशभरात JN1 कोविड व्हेरियंटची २१ प्रकरणं नोंदवली गेली. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये कोरोनाचे २ नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राजधानी दिल्लीतून ३ केसेस समोर आल्या आहेत. ६ दिवसांपूर्वी बंगळुरुतील एका ६४ वर्षीय व्यक्तीचा कोविड १९ संसर्गामुळे मृत्यू झाला होता. या व्यक्तीला कोविड सब-व्हेरियंट JN1 ची लागण झाली होती की नाही हे अद्याप समजलेलं नाही. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ही माहिती दिली. या व्यक्तीचं हृदय निकामी झालं होतं. तसेच त्याला टीबी, उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा आजार आणि न्यूमोनियाची लागण झाली होती. यानंतर आता राज्यभरात कोविड चाचण्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी बुधवारी भारतातील कोविड १९ परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. मांडविया यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्याचं तसेच औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर आणि लसींचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्याचं आवाहन केलंय.
हे वाचलंत का :