नई दिल्ली Soumya Vishwanathan Murder Case : दिल्लीच्या साकेत कोर्टानं पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टानं या ४ दोषींना पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसंच आणखी एक दोषी अजय सेठी याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणी कोर्टानं 18 ऑक्टोबरला मकोका अंतर्गत ४ आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर आणखी एका आरोपीलाही दोषी घोषित केलं होतं. साकेत कोर्टानं या आरोपींना हत्येमधील दोषी ठरवलं होतं त्यामध्ये रवी कपूर, अजय कुमार, अमित शुक्ला आणि बलजीत मलिक यांचा समावेश आहे. कोर्टानं या चारही आरोपींना मकोका अंतर्गत कलम 3(1)(i) अन्वयेही दोषी ठरवलं. त्याचबरोबर पाचवा आरोपी अजय सेठी याला भारतीय दंड संहिता कलम 411 आणि मकोका अंतर्गत 3(2) तसंच 3(5) कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे. या पाचव्या आरोपीला ३ वर्षांची शिक्षा कोर्टानं ठोठावली आहे.
2008 मध्ये झाली होती हत्या - पत्रकार सौम्या विश्वनाथनची 30 सप्टेंबर 2008 रोजी पहाटे सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास हत्या झाली होती. घरी परतताना गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दावा केला होता की, विश्वनाथन यांच्या हत्येच्या मागे लुटमारीचा उद्देश होता. त्यावेळी पोलिसांनी पाच आरोपी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना हत्येच्या आरोपात अटक केलं होतं. सर्वच आरोपी मार्च 2009 पासून पोलिसांच्या ताब्यात आहेत.
या प्रकरणातील आरोपी बलजीत मलिकवर मकोका अंतर्गत खटला सुरू आहे. त्यामुळे त्याला नियमित जामीन मिळाला नाही. या प्रकरणात बलजीतशिवाय रवी कपूर आणि अमित शुक्ला हे देखील आरोपी आहेत. याशिवाय रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना 2009 मध्ये आयटी एक्झिक्युटिव्ह जिगिषा घोष हत्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आलं होतं.
हेही वाचा..