कोलकाता : विशेष पीएमएलए न्यायालयाने सोमवारी संध्याकाळी पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी ( Partha Chatterjee ) यांच्या ईडी कोठडीत ३ ऑगस्टपर्यंत वाढ केली. न्यायालयाने चॅटर्जी यांच्या नजिकच्या सहकारी अर्पिता मुखर्जी ( Arpita Mukherjee ) हिच्या ईडी कोठडीतही ३ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. चटर्जी यांच्या वकिलांनी सांगितले की, ते पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करतील आणि त्यानंतर निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जावे की नाही याचा निर्णय घेतील. चॅटर्जी आणि मुखर्जी या दोघांनाही ३ ऑगस्टपर्यंत ४८ तासांच्या अंतराने कोणत्याही रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केले जावे, असा आदेश पीएमएलए कोर्टाने दिला.
कोठडीत वाढवण्याच्या बाजूने युक्तिवाद करताना, ईडीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एम.व्ही. राजू यांनी दावा केला की ED च्या अंदाजानुसार, WBSSC भरती अनियमिततेमध्ये 120 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा होता. अर्पिता मुखर्जीच्या निवासस्थानातून काही पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चौकशीसाठी चॅटर्जी आणि मुखर्जी यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला. दरम्यान, ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, मुखर्जी यांच्या निवासस्थानी छापे मारताना त्यांच्या निवासस्थानातून दोन कार्यरत डायरी जप्त करण्यात आल्या आहेत.
काय लिहिले आहे डायरीत - शिक्षण विभाग, पश्चिम बंगालच्या सरकार सूत्रांनी सांगितले की, दोन्ही डायरीमध्ये अनेक कोड आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांना असा विश्वास आहे की, ते कोट्यवधींच्या भरती घोटाळ्यातून जमा झालेल्या खात्यांच्या काही विवरणांशी संबंधित आहेत. दरम्यान, ईडीच्या वकिलांनी पीएमएलए न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितले की, अटक झाल्यापासून चटर्जी एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सतत धमक्या देत आहेत. राजू यांनी दावा केला की ईडीच्या अधिकार्यांनी चटर्जी यांनी दिलेल्या धमक्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. रविवारी त्यांना सरकारी एसएसकेएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी चॅटर्जी यांना सोमवारी सकाळी एम्स भुवनेश्वर येथे नेण्यात आले, मंगळवारी त्यांना कोलकाता येथे आणले जाईल.