नवी दिल्ली - प्रत्येकाने एकत्रित काम करून पुढील कोरोना लाटेपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता होऊ नये, यासाठी एकत्रित काम करावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने दिल्लीच्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या मागणीवर वादग्रस्त अहवाल दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री यानी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणीच्या तुलनेत चारपटीने मागणी केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने म्हटले आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी दिल्ली सरकारवर टीका केली आहे. हा वाद वाढत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की जर तुमचा ऑक्सिजन पुरवठ्बाबतचा वाद मिटला असेल तर आपण आता काम करू शकतो. तिसऱ्या लाटेत कुणालाही ऑक्सिनचा तुटवडा भासू नये, यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी यंत्रणा तयार करू, असेही केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-आई-वडिलांची आठवण करून देत मेजरचे दहशतवाद्याला शरण येण्याचे आवाहन, अन्...
एकत्रित लढलो तर देश जिंकणार आहे-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा खूप तुटवडा होता. हे तिसऱ्या लाटेत होऊ नये, जर आपण एकमेकांमध्ये लढत राहिलो तर कोरोना जिंकणार आहे. जर आपण एकत्रिपणे लढलो तर देश जिंकणार आहे.
हेही वाचा-‘माझा गुन्हा हाच की...' कथित ऑक्सिजन अहवालावर केजरीवालांचे भावनिक टि्वट
समितीचा अहवाल हा बनावट - सिसोदिया-
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल म्हणजे भाजपकडून काही तरी डाव शिजत असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी केला होता. समितीचा अहवाल हा बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने काय म्हटले आहे?
सर्वोच्च न्यायालयाच्या नेमलेल्या समितीने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी फॉर्म्युला तयार केला होता. त्यानुसार समितीने २६० रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. या फॉर्म्युलानुसार १८३ रुग्णालयांचे परीक्षण करण्यात आले. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार १८३ रुग्णालयांमध्ये ११४० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर सुरू होता. प्रत्यक्षात या रुग्णालयांमध्ये २८९ मेट्रिक टनचा वापर करण्यात येत होता, असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दिल्लीला जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याने इतर राज्यांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्याचेही समितीने अहवालात नमूद केले आहे.