लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोना विषाणूबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लखनऊच्या सांडपाण्यात कोरोना विषाणू आढळून आले आहेत. सध्या कोरोना विषाणू मिश्रीत पाण्याची तपासणी करण्यात येत आहे.
मुंबईतील सांडपाण्यातही कोरोनाचे विषाणू
नमुना चाचणीसाठी एकुण ८ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील एसजीपीआयचाही सामावेश आहे. लखनऊमध्ये तीन ठिकाणाहून चाचणीसाठी नुमने घेण्यात आले होते. त्यापैकी एका नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आला आहे. याव्यतरिक्त मुंबईतील सांडपाण्यातही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील इतर राज्यातही याबाबतची तपासणी सुरू आहे.
विषाणू कोरोनाबाधित रूग्णाच्या विष्ठेतून पाण्यात पोहोचला
डॉ. उज्ज्वला घोषाळ यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण झालेले सर्व रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा मल गटारात पडतो. विविध देशांमधील अभ्यासात असे आढळले आहे, की 50 टक्के रुग्णांच्या मलमध्येही कोरोना विषाणू असतो. आणि त्यांच्या माध्यमातूनच हा विषाणू सांडपाण्यात पोहचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.