लखनौ - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंचायत निवडणुका घेतल्याने उत्तर प्रदेशला महामारीच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा संसर्ग १२० टक्क्यांनी वाढला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गतवर्षी ३० जानेवारी ते चालू वर्षात ४ एप्रिलपर्यंत कोरोनाने ६ लाख ३० हजार लोकांना संसर्ग झाला होता. मात्र, पंचायत निवडणुकीत प्रचार आणि मेळाव्यांनी कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढून एकूण १४ लाख झाले आहे.
हेही वाचा-गोपनीयतेचे धोरण अपडेट नसेल तरी व्हॉट्सअपचे अकाउंट राहणार सुरू
मृत्युच्या प्रमाणात ५९.१० टक्क्यांची वाढ
पंचायत निवडणुकीत कोरोनाबाधितांच्या मृत्युच्या प्रमाणात ५९.१० टक्क्यांची वाढ झाली आहे. पंचायत निवडणुकीच्या काळात कोरोनाबाधितांच्या मृत्युंचे प्रमाणही वाढले आहे. सरकारी आकडेवारीनुसार ५ एप्रिल ते ५ मेपर्यंत एकूण ५,२५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापूर्वी ४ एप्रिलपर्यंत एकूण ८,८९४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत पंचायत निवडणुकीत कोरोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण ५९.१० टक्क्यांनी वाढले आहे.
हेही वाचा-रेमडेसिवीरचा १६ मे रोजीपर्यंत देशात पुरेसा पुरवठा करणार- सदानंद गौडा
७०६ प्राथमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू
उत्तर प्रदेशमध्ये ७०६ प्राथमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा दावा उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे. निवडणुकीच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढलेला पाहता पंचायत निवडणुकीची मतगणना रद्द करण्याची मागणीही उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, सरकार आणि निवडणूक आयोगाने प्राथमिक शिक्षक संघाची मागणी मान्य केली नाही. दुसरीकडे शिक्षक संघटनेने मृत झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केल्याने उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.