नवी दिल्ली - राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी आज दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात काँग्रेसला वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेअंती निवडणुका स्वबळावर लढण्याचे निश्चित करण्यात आल्याचे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली. या बैठकीत पुढच्या काळात पक्ष मजबुतीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबतची चर्चा झाली. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, यासाठी काम करण्याचे आदेश आपल्याला मिळाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तीन वर्षांनंतर आहेत याबाबतचा निर्णय हाय कमांड घेईल, पण आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढेल, अशी माहिती या भेटीनंतर नाना पटोले यांनी दिली.
विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच असेल असंही यावेळी नाना पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
फडणवीस सरकारच्या काळात माझाही फोन टॅप झाला -
2016-17 मध्ये फडणवीस सरकारमध्ये माझे फोन टॅप झाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांचेही फोन टॅप झाले होते. त्याबाबत मी विधानसभेत आवाज उठवला होता. त्याची चौकशी सुरू असल्याचे नाना फडणवीस यांनी सांगितले.
फेरबदलाचा निर्णय हायकमांड घेईल -
दरम्यान, राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत झाली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.