गुवाहाटी (आसाम) Congress MLA Arrested : हिंदू धर्माविरोधात दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जलेश्वर येथील काँग्रेसचे आमदार आफताब उद्दीन मोल्ला यांना अटक करण्यात आलीय. आफताब उद्दीन मोल्लांना पोलिसांनी मंगळवारी रात्री दिसपूर येथील आमदार निवासातील काँग्रेसचे सहकारी आमदार वाजेद अली चौधरी यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलंय. काँग्रेस आमदाराच्या विरोधात दिसपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी मंगळवारी रात्री गुवाहाटीच्या पूर्व पोलीस जिल्ह्यातील डीसीपी कार्यालयात आमदाराची चौकशी केल्यानंतर त्यांना विशेष शाखेच्या कक्षात ठेवण्यात आलंय.
काय म्हणाले होते आमदार आफताब उद्दीन मोल्ला : गोलपारा जिल्ह्यातील जलेश्वर इथं 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आफताब उद्दीन मोल्ला यांनी हिंदू मंदिरं आणि नामघरींचे पुजारी ('नामघर' या प्रार्थनागृहाचे सदस्य) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. वैष्णव संतांचे विचार बलात्काराच्या घटनांमध्ये गुंतलेले आहेत, असं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सार्वजनिकपणे ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा बलात्कार होतो, तेव्हा त्यात मंदिराचा पुजारी किंवा नामघरी सामील असल्याचं दिसून येतं. कोणताही मुस्लिम आलम किंवा इमाम असं कृत्य करत नाही. जर कोणी तसं केलं असेल तर संबंधित पुरावे सादर करावे लागतील. समाजात व्यभिचार किंवा वाईट कृत्ये होत असतील तर ते हिंदू लोक करतात. तसे मुस्लिम करत नाहीत, असे वादग्रस्त विधान केलं होतं.
पक्षानं बजावली कारणे दाखवा नोटीस : आमदारांच्या भाषणानंतर वाद सुरू होताच आफताबुद्दीन मोल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या शब्दाबद्दल माफी मागितली. मात्र माफी मागून मोल्ला सुटू शकले नाहीत. त्यांच्याविरोधात अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. भेटापारा येथील दीपककुमार दास नावाच्या व्यक्तीनं मंगळवारी शहर पूर्व पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर दिसपूर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हिंदू धर्माविरोधात अशी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोराह यांनी आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याबाबत स्पष्टीकरण मागितलंय.
हेही वाचा :