नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने 'इंधनकरजीवी' असल्याचा आरोप काँग्रेसने केंद्रावर केला. केंद्र सरकारने गेल्या साडेसहा वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात जनतेकडून 21.50 लाख कोटी रुपये वसूल केले आहेत, असा दावा काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. इंधन किंमती कमी करून देशातील सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
'इंधनकरजीवी' मोदी सरकार देशातील लोकांसाठी एक शाप बनले आहे. पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून त्यांनी 2014 पासून आजपर्यंत तब्बल 21.50 लाख कोटींची लूट केली आहे. त्यामुळे भयंकर जनलूट पार्टी, असे भाजपाचे नवे नाव असल्याचे ते म्हणाले.
गेल्या 11 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग वाढतच आहेत. 1 मे, 2019 ते आतापर्यंत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 15.21 रुपये आणि डिझेलच्या किंमती 15.33 रुपयांनी वाढल्या आहेत. देशातील बर्याच भागात पेट्रोल 100 रुपयांवर तर डिझेल 90 रुपयांच्या पुढे गेले आहे, 'हम दो, हमारे दो', 'डीजल 90, पेट्रोल सौ' हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे, असे ते म्हणाले.
26 मे 2014 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 108.05 होती. तेव्हा पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 71.51 रुपये होते. आज ती प्रतिलिटर 90.19 रुपयांवर पोचली आहे. कच्च्या तेलाची किंमत 41 टक्क्यांनी खाली आली आहे. मात्र, पेट्रोलच्या किंमती 26 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत 41 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे मे 2014 मध्ये डिझेलची किंमत प्रति लिटर 57.28 रुपये होती, जी आज वाढून 80.60 रुपये झाली आहे, असे ते म्हणाले.