हैदराबाद - पोलिसांच्याकडील हत्यारांचा वापर तसा खूपच कमी होतो. मात्र ही हत्यारे व्यवस्थित राहावीत यासाठी नियमित त्याची देखभाल करावी लागते. त्याचबरोबर त्याचा वापरही करणे अपेक्षित असते. गरजेच्यावेळी प्रत्यक्ष हत्याराचा वापर करता येणे क्रमप्राप्त असते. त्यासाठी सरावही गरजेचा असतो. असाच सराव राचकोंडा पोलीस आयुक्तालयामार्फत येथे आयोजित केला होता.
हैदराबादच्या राचकोंडा पोलीस आयुक्तालयाने वार्षिक गोळीबार सराव सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये दस्तुरखुद्द आयुक्त मराठमोळे आय पी एस अधिकारी पोलीस आयुक्त महेश भागवत सहभागी झाले होते. त्याचबरोबर एलबी नगरचे आणि भोंगीरचे पोलीस उपायुक्त, गुन्हे तसेच परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त सहभागी झाले होते. टीएसपीए गोळीबार मैदानावर या सरावाचे आयोजन केले होते.
यावेळी एके-४७, एमपी-५, ग्लॉक पिस्तुल अशा वेगवेगळ्या हत्यारांचा सराव गोळीबार करण्यात आला. वेळोवेळी अशा प्रकारच्या सराव शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे ही हत्यारे कशी हाताळावीत. त्यातून गोळीबार कसा करावा याचा सराव करण्यात येतो. प्रत्यक्ष काम करताना वेळप्रसंगी ही हत्यारे सफाईदारपणे वापरण्यासाठी त्याचा उपयोग होतो.