पणजी (गोवा) - संघटित आणि असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणसाठी स्मार्ट कामगार कार्ड उपलब्ध करून देण्याचा गोव्यात सरकारने पहिला प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील या स्मार्ट लेबर कार्ड सुविधेचे उद्घाटन केले. गोव्याच्या खासगी क्षेत्रातील कामगारांना देखील या कार्डचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व कामगारांनी हे कार्ड घ्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
खासगी क्षेत्रातील कामगारांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल-
मुख्यमंत्री म्हणाले, की कामगार व रोजगाराच्या क्षेत्रातील सर्व योजना व धोरणे स्मार्ट कामगार कार्डशी जोडली जातील. ते म्हणाले, की स्मार्ट कामगार कार्ड योजनेच्या सुरूवातीस सरकारला धोरण ठरविण्यात आणि कामगार आणि रोजगाराच्या विविध विषयांवर निर्णय घेण्यात मदत होईल. कामगारांच्या हितासाठी स्मार्ट कामगार कार्ड सुरू करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी कामगार व रोजगार विभागाचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विभागाने पहिल्या प्रयत्नात जवळपास 9500 कार्ड तयार केले असून उर्वरित लवकरच तयार केली जातील. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की रोजगार मेळाव्याचा लाभ कोणीही घेवू शकतो. स्मार्ट लेबर कार्डमुळे खासगी क्षेत्रातील कामगारांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल.
गोव्यातल्या प्रत्येक इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी हे कार्ड घ्यावे -
आमचे सरकार हे सुरुवातीपासूनच कामगारांच्या हिताचा विचार करत आहे. त्यामुळे हे कामगारांचे सरकार म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले. गोव्यातील प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी लवकरात लवकर हे कार्ड घ्यावे. आमचे लेबर डिपार्टमेंट आपल्याला सर्व ते सहकार्य करेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गोवा सरकारच्या कामगार खात्यांतर्गत विविध योजना राबविल्या जातात, या योजनांचा लाभ देखील या कार्ड च्या माध्यमातून कामगारांना दिला जाणार आहे. आरोग्य सुविधा असतील किंवा शैक्षणिक योजना असतील, याबरोबरच घरबांधणीच्या योजना या सर्व योजनांचा लाभ कामगारांना या स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील सर्व कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
कामगारांच्या हिताच्या संरक्षणासाठी हे कार्ड गोवा सरकारने सादर केले -
कामगार व रोजगार मंत्री जेनिफर मॉन्सरेट यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, कामगार व रोजगार विभागाने कामगार तसेच नियोक्ता व नियोक्ता यांच्या संघटनांसाठी स्मार्ट कामगार कार्ड सुरू केले आहेत. गोवा रोजगार आणि सेवानिवृत्ती लाभ कायदा 2001 अंतर्गत कामगारांच्या कल्याण, सुरक्षा, शिक्षण आणि कामगारांच्या हिताच्या संरक्षणासाठी हे कार्ड गोवा सरकारने सादर केले होते.