पणजी - हवामानखात्याकडून गोव्यात शुक्रवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात गोव्यात मुसळधार पाऊस होणार असून सर्व शासकीय व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. गोव्यात आज सकाळपासून विविध भागात पावसाला सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आजपासून दोन दिवस शाळांना सुट्टी - राज्यात मागच्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी हवामान खात्याच्या वतीने राज्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होणार असून माध्यमिक शाळांना व अंगणवाड्यांना सरकारच्या वतीने सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश - हवामान खात्याच्या वतीने राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण व उत्तर गोवा जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनाही कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.