नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी शुक्रवारी अमेरिकन बार असोसिएशनच्या (ABA) तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी चंद्रचूड म्हणाले की, सोशल मीडियाच्या विस्तारामुळे खोट्या बातम्यांचे युग आले आहे. तुम्ही सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले तर तुमच्याशी सहमत नसलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला ट्रोल होण्याचा धोका असतो. आज सोशल मीडियाच्या युगात आपण वेगळे विचार स्वीकारायला तयार नाही.
संविधान बनले तेव्हा प्रायव्हसीची संकल्पना नव्हती : अमेरिकन बार असोसिएशनच्या तीन दिवसीय परिषदेत सरन्यायाधीशांनी 'लॉ इन द एज ऑफ ग्लोकलायझेशन: कन्व्हर्जन्स ऑफ इंडिया अँड द वेस्ट' या विषयावर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी संविधानाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, जेव्हा संविधान बनवले गेले तेव्हा आपल्या संविधान निर्मात्यांना माहित नव्हते की मानवतेचा विकास कोणत्या दिशेने होईल. आमच्याकडे प्रायव्हसीची संकल्पना नव्हती. इंटरनेट, अल्गोरिदम आणि सोशल मीडिया नव्हते. आता मात्र आपण अल्गोरिदमद्वारे कंट्रोल होणाऱ्या जगात राहतो आहे.
जागतिकीकरणामुळे जगात असंतोष वाढला : चंद्रचूड पुढे म्हणाले की, जागतिकीकरणामुळे जगात असंतोष वाढला आहे. सध्या संपूर्ण जग मंदीने ग्रासले आहे. जागतिकीकरणविरोधी भावनांमध्ये बदल होत आहे. सध्या विचारांच्या जागतिकीकरणाचे युग आहे. नवीन तंत्रज्ञान जगण्याची पद्धत बदलत आहे. या दरम्यान सरन्यायाधीशांनी कोविड-19 च्या काळाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात भारतीय न्यायव्यवस्थेने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे युग सुरू केले. त्यानंतर सर्व न्यायालयांनी ते स्वीकारले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता प्रादेशिक भाषांमध्ये : सरन्यायाधीश म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन, ई-फायलिंग सुरू करण्यात आले आहे. लाइव्ह स्टीमिंगही सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून न्यायालयात सुनावणी कशी होते, हे जनतेला कळू शकेल. सर्वोच्च न्यायालयाचे हजारो निकाल प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित केले जात आहेत, ज्यामुळे कायद्याच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत निकाल वाचणे सोपे होईल. त्याचबरोबर असे केल्याने अनेक लोकांसाठी न्यायालयीन प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे प्रत्येक भारतीय भाषेत भाषांतर करत त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचे कौतुक केले आहे.