पणजी - आपल्या आजूबाजूला एखादी संशयास्पद हालचाल दिसली तर त्याची माहिती पोलिसांना दिली गेली पाहिजे. कारण आपल्याला आपल्याच बाजूला कोण राहतो, हेच कधी-कधी माहिती नसते. त्यामुळे आजच्या जगात नागरिकांनी कायम सतर्क असले पाहिजे, असे मत माजी सैनिक कल्याण मंडळाचे सचिव मेजर वेणूगोपाल नायर यांनी पणजीत व्यक्त केले.
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध संघटनांच्यावतीने गुरुवारी पणजीत आझाद मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वेणूगोपाल नायर बोलत होते. यावेळी महापौर उदय मडकईकर, अखिल गोवा माजी सैनिक संघटना अध्यक्ष अनंत जोशी, पणजी पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना नायर म्हणाले, आपल्या देशातील लोकसंख्या आणि पोलीस यांचा विचार केल्यास एक पोलीस किती जणांचे रक्षण करू शकतो, ही बाब विचारात घेण्यासारखी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सतर्कता आवश्यक आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, पोलीस त्याची पडताळणी करतील, असेही आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.