हैदराबाद Child Trafficking Racket : मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात दाखल बाल तस्करीच्या गुन्ह्याचे धागेदोरे हैदराबादपर्यंत आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हैदराबादेत धाव घेत काही खासगी आणि सरकारी रुग्णालयाची झाडाझडती घेत चौकशी सुरू केली आहे. गर्भात असलेल्या बाळांची नाळ कापण्याअगोदरच किंमत ठरवण्यात आल्याचा किळसवाणा प्रकार मुंबईत उघडकीस आला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नाशिकचा बाल तस्कर समाधान पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
दादर रेल्वे स्थानकावर पकडलं रंगेहात : मुंबईतील एक चिमुकला बेपत्ता झाल्यानं त्याच्या पालकांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या बेपत्ता मुलाचा कुरार पोलीस शोध घेत होते. पोलिसांनी या प्रकरणात दादर रेल्वे स्थानकात एका तस्कराला पकडलं होतं. यावेळी पोलिसांनी तपास केला असता, हा तस्कर समाधान पाटील असल्याचं उघड झालं होतं. समाधान पाटील यानं हैदराबादमध्ये विकत घेतलेल्या मुलाच्या विक्रीचा सौदा न करता, मुंबईला परत येताना दादर रेल्वे स्थानकात त्याला पकडण्यात आलं होतं.
नाशिकचा समाधान पाटील हैदराबादमधून करायचा तस्करी : मुंबई पोलिसांनी पकडलेला समाधान पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. समाधान पाटील हा नाशिकमध्ये मुलांचा विक्री एजंट आहे. हैदराबादमधून घेतलेला मुलगा घेऊन तो मुंबईत परतल्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या टोळीतील पाच तस्करांना अटक केली. समाधान पाटील हा हैदराबाद इथल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयातून रुग्णांची माहिती घ्यायचा. यावेळी तो गरोदर महिलांची माहिती काढत असे. प्रसूतीनंतर गरीब महिलांना लाखो रुपयांचं आमिष दाखवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रस्ते, फूटपाथ आणि रुग्णालयातून मुलांचं अपहरण : लहान मुलांना मोठी मागणी असल्यानं समाधान पाटील याची तस्कर टोळी रस्ते आणि रुग्णालयातून मुलांचं अपहरण करायची. मूल दत्तक घेणं आणि देण्याची प्रक्रिया किचकट असल्यानं समाधान पाटीलची टोळी बाहेरच्या बाहेर सौदा करुन लाखो रुपये कमवत मुलांची तस्करी करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
फोटो पाठवून ठरवली जाते मुलांची किंमत : समाधान पाटील हा लहान मुलांचे फोटो व्हॉट्सअॅपनं पाठवून किंमत ठरवत होता. प्रत्येक चिमुकल्यासाठी दोन ते तीन लाख रुपये किंमत आकारली जात असल्याचं पोलीस तपासात पुढं आलं आहे. हैदरबादमधून आतापर्यंत समाधान पाटीलच्या टोळीनं 30 ते 40 मुलं नाशिकमध्ये विकल्याचा पुरावा पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी हैदराबाद शहरात धाव घेत हैदराबाद पोलिसांच्या मदतीनं शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयाची झाडाझडती सुरू केली आहे.
हेही वाचा :