अमरावती (आंध्र प्रदेश) Chandrababu Naidu : कथित कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना अंतरिम जामीन मंजूर केला. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना ४ आठवड्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. जामीन मिळाल्यानंतर चंद्रबाबू मंगळवारी सायंकाळी तुरुंगातून बाहेर आले. ते राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त होते.
'या' तारखेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश : नायडू यांच्या वकिलांनी न्यायालयात त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयानं जामीन मंजूर करत त्यांना २८ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी राजमहेंद्रवरम येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे की, 'मानवतावादी दृष्टिकोन आणि त्यांची प्रकृती लक्षात घेऊन अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. न्यायालयानं नियमित जामीन याचिकेवर सुनावणीसाठी १० नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
सरकारी डॉक्टरांचे अहवाल आले : चंद्राबाबू नायडू यांच्या प्रकृतीबाबत या आधी सरकारी डॉक्टरांचे अहवाल समोर आले होते. कुटुंबीय, पक्षाचे कार्यकर्ते आणि चंद्रबाबूंच्या वैयक्तिक डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांना पाच प्रकारच्या औषधांची शिफारस करण्यात आली आहे. त्यात दोन प्रकारचे मलम, दोन गोळ्या आणि एका लोशनचा समावेश आहे. चंद्रबाबूंनी छातीची समस्या, हात, मान, हनुवटी, पाठ आणि शरीराच्या इतर भागांवर आणि त्वचेच्या ऍलर्जीसाठी उपचार घेतले होते.
चंद्रबाबू नायडू डिहायड्रेशननं त्रस्त : चंद्रबाबू नायडू यांची राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात तपासणी केल्यानंतर सरकारी डॉक्टरांनी त्यांना गंभीर आरोग्य समस्या असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, चंद्रबाबू काही दिवसांपासून डिहायड्रेशननं त्रस्त होते. चंद्रबाबूंना हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीची समस्या असल्याचं खासगी डॉक्टरांचं म्हणणे आहे. डिहायड्रेशनमुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली होती.
९ सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत घेतलं : टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना कथित कौशल्य विकास घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ९ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस कोठडीत घेण्यात आलं होतं. त्यांच्या अटकेनंतर टीडीपी समर्थकांनी सरकारचा निषेध केला होता. सरकार जाणीवपूर्वक असं करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
हेही वाचा :