डेहराडून : चमोलीतील दुर्घटनेनंतर हिमकडा कोसळण्याच्या कारणांचाही शोध घेतला जात आहे. अद्याप या हिमकडा कोसळण्यामागील नेमके कारण कळू शकले नाही. याविषयी आता वेगवेगळे तर्क संशोधंकांकडून लावले जात आहेत.
अभ्यासाअंती कळेल कारण
वाडिया इन्स्टिट्युट ऑफ हिमालयन जिओलॉजिचे संचालक कालाचंद साई यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या एक्स्क्लुसिव्ह मुलाखतीत याविषयीच्या कारणांची चर्चा केली. या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी 2 पथके सोमवारी पाठविली जाणार आहेत असे ते म्हणाले. उत्तराखंड भागात सार्स टाईप ग्लेशिअर अजून आढळलेले नाही. त्यामुळे ग्लेशिअर लेकशी संबंधित कारण या घटनेला जोडले जाऊ शकत नाही. ग्लेशिअरचा एखादा तुकडा पडल्याने दुर्घटना घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. मात्र थंड वातावरणात सहसा ग्लेशिअर्स तुटत नाही. त्यामुळे अभ्यासाअंतीच याच्या कारणांचा शोध लागेल असे ते म्हणाले.
का तुटतात ग्लेशिअर?
प्रामुख्याने ग्लोबल वॉर्मिंग हे ग्लेशिअर तुटण्याचे महत्वाचे कारण समजले जाते. तापमान वाढीमुळे हिमकड्यांवरील बर्फ वेगाने वितळतो आणि त्याचा एखादा भाग तुटून वेगळा होतो. यानंतर ग्लेशिअरखाली असलेले पाणीही मोकळे होते आणि ते मिळेल त्या वाटेने वाहू लागते. मोठ्या प्रमाणात साठलेले पाणी एकाच वेळी वाहू लागल्याने प्रचंड पुरात त्याचे रुपांतर होते आणि मोठे नुकसान यामुळे संभवते.
रात्रीच्या दुर्घटनेत होते मोठी हानी
अशा घटना रात्री घडल्या तर मोठे नुकसान होते असेही कालाचंद साई म्हणाले. 2013 मध्ये केदारघाटीमध्ये आलेल्या महाप्रलयाची घटनाही रात्री घडली होती. त्यामुळे लोकांना बचावाची संधी मिळाली नाही आणि मोठे नुकसान झाले असे ते म्हणाले.