रायपूर : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलाने राबविलेल्या एका स्वतंत्र मोहीमेदरम्यान दोन नक्षल्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. यापैकी एका नक्षलवाद्याचा हा 2012 मधील एका आयएएस अधिकाऱ्याच्या अपहरणात समावेश असल्याचे पोलीस म्हणाले.
वेगवेगळ्या ठिकाणहून अटक
जिल्हा राखीव दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरूवारी सुकमा जिल्ह्यातील फुलबागडी पोलीस ठाणे हद्दीतून रवा गंगा याला अटक केली. तर दंतेवाडाला लागून असलेल्या काटेकल्याण पोलीस ठाणे हद्दीतील जंगलातून सुखराम कावसी याला अटक करण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले. गंगा हा 2011 मध्ये नक्षल संघटनेत सहभागी झाला होता. 2012 मध्ये सुकमाचे जिल्हाधिकारी अलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण करणाऱ्या माओवादी दलाचा तो सदस्य होता. मेनन यांची नंतर सुटका करण्यात आली होती.
नक्षल कारवायांमध्ये सहभाग
अटक करण्यात आलेले नक्षलवादी आईडी स्फोट, सुरक्षा दलाला लक्ष्य करणे अशा कारवायांमध्ये सहभागी होते. कावसी हा दंडकारण्य आदीवासी किसान मजदूर संघटनचा प्रमुख होता. पोलीस दलावर हल्ला, आईडी स्फोट अशा कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांवरही एक लाखांचे बक्षीस होते.
हेही वाचा - तालिबानींच्या समर्थनार्थ पोस्ट करणे पडले महागात...14 जणांना आसाम पोलिसांकडून अटक