नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटानंतर तिसरी लाट येणार अशी चर्चा सुरू आहे. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक त्रास लहान मुलांना होईल, असे म्हटलं जात आहे. भविष्यकाळ अनिश्चित असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोना प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाबाधित मुलांना उपचारादरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करु नका असे सांगण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या मुलांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी कोरोना केअर केंद्राची सध्याची क्षमता वाढविली पाहिजे. प्रौढांपेक्षा मुलांमध्ये संसर्ग लक्षणविरोधी किंवा सौम्य लक्षणात्मक असतो. त्यामुळे मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस मंजूर झाल्यास, इतर रोगांनी ग्रस्त असलेल्या आणि कोरोनाचा गंभीर धोका असलेल्या मुलांना लसीकरणात प्राधान्य दिले पाहिजे. भारताच्या भारत बायोटेकसह अनेक फार्मा कंपन्यांनी मुलांवर लसांच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत.
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राकडून संयुक्त प्रयत्न -
लॉकडाउन हटवल्यानंतर किंवा शाळा पुन्हा उघडल्यानंतर पुढील तीन-चार महिन्यांत संभाव्य तिसर्या लहर येण्याची संभावना आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राकडून संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.
प्रशिक्षित डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या -
प्रशिक्षित डॉक्टर आणि परिचारिकांची संख्याही वाढवली पाहिजे. तसेच आरोग्य अधिकाऱयांनी मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी क्षमता वाढवण्याचे कार्यक्रम सुरू केले पाहिजेत. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या मुलांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करावी. कोरोना रूग्णालयात मुलांच्या संगोपनासाठी एक वेगळे क्षेत्र तयार केले पाहिजे. जिथे पालकांना मुलांना सोबत जाण्याची परवानगी असेल. तसेच रुग्णालयांमध्ये एचडीयू आणि आयसीयू सेवा वाढवण्याचीही गरज आहे.
स्टिरॉइडचा वापर टाळवा -
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे, की संक्रमित मुलांना अँटी-व्हायरल रेमडेसिविर देऊ नये. मुलांमध्ये स्टिरॉइडचा वापर टाळला जावा. अत्यंत गंभीर रूग्णांच्या उपचारादरम्यान डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्टिरॉइड औषधांचा वापर करण्यात यावा.