नवी दिल्ली : देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी नॅशनल अॅग्रिकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) यांना महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी 'किचनची राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या किमती 200 रुपये किलोपर्यंत वाढल्या आहेत. आता केंद्राच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टोमॅटो सवलतीच्या दरात वितरित केले जातील : ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात असे म्हटले आहे की, शुक्रवारपासून दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) या क्षेत्रातील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून टोमॅटो सवलतीच्या दरात वितरित केले जातील. मंत्रालयाने सांगितले की, नाफेड आणि एनसीसीएफ टोमॅटोची खरेदी करतील. हे टोमॅटो अशा भागांमध्ये विकले जातील जेथे गेल्या एका महिन्यात याच्या किमतीमध्ये भारताच्या सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातून होतो आहे पुरवठा : मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमधील बाजारपेठेत येणारा पुरवठा हा बहुतांशी महाराष्ट्रातील सातारा, नारायणगाव आणि नाशिक येथून येतो. हा पुरवठा जुलै अखेरपर्यंत चालेल. मंत्रालयानुसार आंध्र प्रदेशातील मदनपल्ले (चित्तूर) येथेही वाजवी प्रमाणात आवक सुरूच आहे. तसेच दिल्ली - एनसीआरमधील आवक प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील कोलार येथून होत आहे.
भविष्यात किमती कमी होण्याची अपेक्षा : नाशिक जिल्ह्यातून नवीन पिकाची आवक लवकरच अपेक्षित असून ऑगस्टमध्ये नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून अतिरिक्त पुरवठा अपेक्षित असल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. मध्य प्रदेशातूनही टोमॅटोची आवक लवकरच सुरू होईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. त्या अनुषंगाने आता नजीकच्या भविष्यात टोमॅटोच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे, असे मंत्रालयाने नमूद केले आहे.
हेही वाचा :