नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज (गुरुवार) केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या (सीबीएसई ) दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. दहावी बारावीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहेत. तर निकाल १५ जुलैला जाहीर करण्यात येतील, अशी घोषणा पोखरियाल यांनी केली. कोरोनाच्या पाश्वभूमीवर यावर्षी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
१० जूनपर्यंत चालणार परीक्षा -
४ मे ला सुरू झालेल्या परीक्षा १० जूनपर्यंत चालणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सीबीएसईच्या परीक्षा होत असतात. मात्र, कोरोमुळे यावर्षी परीक्षा पुढे गेल्या आहेत. २०२१ वर्षात १० वी १२ वी च्या परीक्षा उशीरा सुरू होणार असल्याची घोषण शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी आधीच केली होती. त्यानुसार आता परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
कोरोनामुळे नियोजनात बदल
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीबीएसईच्या परीक्षा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेता येणार नाही, अशी घोषणा पोखरियाल यांनी २२ डिसेंबरला केली होती. जानेवारी महिन्यापासून परीक्षासंबंधी प्रात्यक्षिके सुरू होत असतात. मात्र, कोरोनामुळे सर्व परीक्षेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सर्व परीक्षा खोळंबल्या होत्या. वार्षीक परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. तसेच २०२०-२१ हे शैक्षणिक वर्षही निम्मे कोरोना महामारीत गेले.