मुंबई Badlapur Akshay Shinde Encounter- बदलापूरमधील शाळेतील चिमुकलींवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टरचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. न्यायालयानं याप्रकरणी लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी अक्षयच्या पित्यानं याचिकेतून मागणी केली आहे. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. खंडपीठानं आरोपीसह चारही पोलिस अधिकाऱ्यांचे 23 आणि 24 सप्टेंबरचे कॉल रेकॉर्ड आणि सर्व कागदपत्रे आजच जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे.
बदलापूर घटनेबाबत मृत आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुनावणीत सरकारी वकिलाला सांगितलं की शारीरिकदृष्ट्या कमकुवत माणूस पटकन रिव्हॉल्व्हर उघडू शकत नाही. हे फार सोपे नाही. आरोपीच्या पायात किंवा हातावर नाही तर थेट डोक्यात गोळी का लागली, असा सवाल उच्च न्यायालयानं केला आहे. आरोपीवरील गोळीबार टाळता आला असता. पोलिसांनी आधी त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न का केला नाही, असादेखील प्रश्न मुंबई उच्च न्यायलयाकडून उपस्थित करण्यात आला आहे. खंडपीठानं म्हटले," बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपींच्या मृत्यूची निष्पक्षपणं चौकशी व्हावी, असे मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणीत मत व्यक्त केलं. एन्काउण्टर वेगळा असतो. याला एन्काउण्टर कसं म्हणणार? संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे," असेही मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
- "फॉरेन्सिककडून माहिती आणा. आधी पॉइंट ब्लॅक रेंज करून गोळी चालवली होती का? तुम्ही आम्हाला पाहिजे तशी उत्तर दिली नाही तर तुम्ही संशयित आहात," असं स्पष्टपणं न्यायालयानं म्हटलं आहं.
अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टरनंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांसह शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट कोर्टाची पायरी चढत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी बनावट एन्काउन्टरमध्ये अक्षय शिंदेचा जीव घेतला आहे.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी याचिकेत काय म्हटले?
- या प्रकरणाची उच्च न्यायालयानं विशेष तपास पथक नेमून चौकशी करावी, अशी मागणी अक्षयच्या वडिलांनी याचिकेत केली आहे. बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाचा जीव घेतला असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
- अक्षय शिंदेच्या एन्काउन्टरमुळे कुणाला लाभ होणार आहे? याची चौकशी व्हावी.
- एन्काउन्टरमध्ये राजकीय लाभार्थी कोण आहेत? त्याचा तपास व्हावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
- बदलापूरच्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचीदेखील उच्च न्यायालयाच्या विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
- या प्रकरणातील दोन फरार आरोपींवरदेखील याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अक्षयप्रमाणे आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्यानं संरक्षणाची मागणी अक्षयच्या वडिलांकडून करण्यात आली आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी तातडीने सुनावणी होईल.
विरोधकांचे सत्ताधाऱ्यांनी फेटाळले दावे- अक्षय शिंदेचा पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. "पोलीस अधिकारी गोळीबारात जखमी होणं ही चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्रात पोलीसदेखील सुरक्षित नाही. जर त्या ठिकाणी सीसीटीव्ही असेल तर सार्वजनिक उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे,"असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. विरोधकांकडून अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांचे दावे फेटाळले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हेही वाचा-
- अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी चौकशीचा ससेमिरा; पोलिसांची झाली अडचण - Akshay Shinde Encounter Case
- बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले; "गोळ्या घालून मारण्यापेक्षा...." - Akshay Shinde Encounter
- अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर' करणाऱ्या पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून बक्षीस; किती पैसे मिळणार? - Akshay Shinde Encounter