पाटणा (बिहार) : बिहारची राजधानी पाटणा येथे लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयने पुन्हा एकदा छापा टाकला आहे. आज सकाळपासून राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयच्या पथकाचे छापे सुरू आहेत. या कारवाईत 12 सदस्यांची टीम सहभागी आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी ही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने यापूर्वीच या छाप्यासाठी नोटीस पाठवली होती.
जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा आरोप : रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांच्यावर जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण 2004 ते 2009 या दरम्यानचे आहे, जेव्हा लालू प्रसाद यादव केंद्रात रेल्वे मंत्री होते. या प्रकरणी लालू यादव यांच्याशिवाय त्यांची पत्नी राबडी देवी, त्यांच्या दोन मुली मीसा भारती आणि हेमा यादव आणि अन्य १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या आरोपानुसार, लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकऱ्या देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली होती.
सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे : या संपूर्ण प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. त्या एफआयआरनुसार, ज्यांना रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांची नावे आहेत. ती नावे पुढीलप्रमाणे - राजकुमार, मिथिलेश कुमार, अजय कुमार, संजय राय, धर्मेंद्र राय, रवींद्र राय, अभिषेक कुमार, दिलचंद कुमार, प्रेमचंद कुमार, लालचंद कुमार, हृदयानंद चौधरी आणि पिंटू कुमार. या सर्वांच्या कुटुंबीयांच्या नावाने जमिनीचे मालकी हक्क लालूंची पत्नी राबडी आणि मुली मिसा भारती आणि हेमा यादव यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आले आणि त्यासोबत लाखोंची रक्कमही देण्यात आली. या बारा जणांवर चुकीच्या मार्गाने सरकारी नोकऱ्या मिळवल्याचाही आरोप आहे.