बंगळुरू : कर्नाटक पोलिसांनी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवमोग्गामध्ये झालेल्या किसान महापंचायतीवेळी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कोट पोलिसांनी सुओ मोटो दाखल करत हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोप्पड पोलीस उपनिरीक्षकांनी तक्रार दाखल केली होती.
२० मार्चला डॉ. दर्शन पॉल आणि युधवीर सिंग यांनी कर्नाटकमध्ये किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. या महापंचायतीला राकेश टिकैतही उपस्थित होते. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी दिल्लीप्रमाणे बंगळुरूमध्येही ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करा असे आवाहन केले होते. यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महापंचायतीला जनता दल (सेक्युलर), जेडीएस आणि काँग्रेस नेत्यांसह तब्बल आठ हजार लोक उपस्थित होते.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा शेतकरी नेत्यांनी निषेध केला आहे. तसेच, याप्रकरणी पुढे कायदेशीर कारवाई काय करता येईल याबाबत त्यांच्या हालचाली सुरू आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळावा यासाठी राकेश टिकैत ठिकठिकाणी किसान महापंचायतींचे आयोजन करत आहेत.
हेही वाचा : एन. व्ही. रमण होणार नवे सरन्यायाधीश; शरद बोबडे यांनी केंद्राकडे केली शिफारस