कालिकत (केरळ) : केरळच्या इलाथूर ट्रेन जाळपोळ प्रकरणात दहशतवादी संबंध असल्याची पुष्टी तपास पथकाने केली आहे. तपास पथकाच्या टीमला आढळून आले की, आरोपी शाहरुख सैफी हा कट्टरपंथी असून तो दहशतवादी मानसिकतेने प्रभावित आहे. एडीजीपी एमआर अजित कुमार यांनी सांगितले की, शाहरुख सैफी सतत कट्टरपंथी झाकीर नाईक आणि इसरार अहमद यांचे व्हिडिओ पाहत असे.
युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे : हा आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने केरळमध्ये आला होते. एडीजीपी अजित कुमार यांनी सांगितले की, आरोपीला स्थानिकांची मदत मिळाली आहे की नाही याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांना आरोपीचा संपूर्ण प्रवास तपशील आणि त्याच्याविरोधात पुरावे मिळाले आहेत. शाहरुखचे बँक खातेही तपासण्यात आले आहे. जेव्हा सर्व पुरावे तपासले गेले तेव्हा त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. एडीजीपीने उत्तर दिले की, केरळ पोलिसांनी या विभागाने जोडलेल्या प्रकरणांचाही तपास केला आहे आणि एनआयए येणार का?, असे विचारले आहे. एडीजीपी पुढे म्हणाले की, सैफी 27 वर्षांचा आहे. त्याने नॅशनल ओपन स्कूलमध्ये 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तो प्रथमच केरळमध्ये आला आहे.
संशयिताला महाराष्ट्रातून अटक केली : काल तपास पथकाने न्यायालयात युएपीए अंतर्गत अहवाल सादर केला होता. त्याच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याचे कलम 15 आणि 16 लागू करण्यात आले आहे. 2 एप्रिलच्या रात्री कोझिकोड ट्रेन जाळण्याची घटना घडली होती. शाहरुख सैफीने अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसला पेट्रोलने आग लावून दिली होती. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण जखमी झाले होते. तपासानंतर केरळ सोडून गेलेल्या संशयिताला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि केंद्रीय गुप्तचर संस्थेने महाराष्ट्रातून अटक केली आहे.