नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी काँग्रेसने मोदी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. हे प्रयत्न कामगिरी सुधारण्याचे अथवा प्रशासकीय बदलाचे नाहीत. तर सत्तेच्या लाभाचे वितरण आणि दोषी असलेल्यांकरिता तडजोड असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकावर निशाणा साधाला आहे. ते म्हणाले, की केंद्रीय मंत्रिमंळाचा विस्तार हा कामगिरीच्या आधारावर नाही. तसे असेल तर पंतप्रधानांना त्यांच्या अपयशाबद्दल पहिल्यांदा काढावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अपयश आल्याने पदावरून दूर करायला पाहिजे. हा मंत्रिमंडळ विस्तार नाही. तर दोषी असलेल्यांसाठी तडजोडीचा कार्यक्रम आहे. विकास, शांतता आणि एकता ही कचऱ्यात टाकून इतिहासजमा करण्यात आली आहे. सध्याच्या पंतप्रधानांना हुकुमशहा म्हणून ओळखले जाईल. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था उद्धवस्त केली. देशाला बेरोजगारीच्या दरीत ढकलले, असा आरोप काँग्रेस प्रवक्त्यांनी केला आहे.
मोदी 2.0 सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून अपेक्षेप्रमाणे नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांना संधी मिळाली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या 43 मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनाही यात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा-चाळीतला मुलगा ते राज्याचा मुख्यमंत्री, आता केंद्रीय मंत्री, असा राहिला नारायण राणेंचा राजकीय प्रवास
केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र-
केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तारापूर्वी आज केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र दिसून आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद आणि केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातील १२ मंत्र्यांचे राजीनामे हे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.
पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतींनी या मंत्र्यांचा स्वीकारला राजीनामा
- केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा
- केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री देवश्री चौधरी
- केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार
- केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल
- केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन
- केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर
- केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद
- केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री संजय धोत्रे
- केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री अंबाला रतन लाल कटारिया
- केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबी
- केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रताप चंद्र सारंगी