कर्नूल Bunny Festival 2023 : आंध्र प्रदेशातील परंपरागत देवरगट्टू बन्नी उत्सवात तीन नागरिकांचा बळी गेल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बन्नी उत्सवातील लाठीमारात तब्बल 100 नागरिक जखमी ( Devaragattu Bunny Festival ) झाल्यानं उत्सवाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. मूर्तीचं संरक्षण करताना झालेल्या लाठीमारात हे 100 नागरिक जखमी झाले आहेत. गणेश ( वय 19 राहणार अस्पारी ) आणि रामजनेयुलू ( वय 54 वर्षे ) यांचा अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू झाला. तर बेल्लारी इथल्या कुरुवा प्रकाश ( वय 35 ) यांचा श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला.
दसऱ्याच्या दिवशी लाठीमार करण्याची परंपरा : आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील देवरगट्टूत दरवर्षी विजया दशमीच्या दिवशी लाठीमार करण्याची परंपरा आहे. देवरगट्टाजवळ असलेल्या टेकडीवर होलागुंडा परिसरात मंगळवारी रात्री 12 वाजता मल्लम्मा आणि मल्लेश्वर स्वामी यांचा विवाह पार पडला. या विवाहानंतर टेकडी परिसरातील पडियागट्टा, रक्षापाडा, या भागात विधीवत मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. या मूर्तीच्या मिरवणुकीत मूर्ती मिळवण्यासाठी 3 गावातील नागरिकांनी गट तयार केला होता. तर इतर गावातील नागरिकांनी दुसरा गट तयार केला. यावेळी मूर्तींसमोर एकमेकांना नागरिकांनी लाठ्यांनी मारहाण केली. या उत्सवाला आंध्र प्रदेशात बन्नी उत्सव असं म्हणतात. ही परंपरा आंध्र प्रदेशात अनेक वर्षापासून सुरू आहे.
बन्नी उत्सवात लाखो भाविकांची हजेरी : आंध्र प्रदेशातील बन्नी उत्सवात लाखो भाविक उत्साहानं हजेरी लावतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि जवळच्या राज्यातूनही लाखो भाविक बन्नी उत्सवासाठी मोठी गर्दी करतात. मल्लमा देवी आणि मल्लेश्वर स्वामी यांची मिरवणूक झाल्यानंतर भाविक एकमेकांना लाठीमार करुन मूर्ती घेण्यासाठी प्रयत्न करतात. यावर्षी अलरू, सुलुवाई, एल्लार्थी, अरिकेरा, निद्रावती आणि बिलेहल या गावातील नागरिकांनी आपला गट तयार केला होता. मात्र यावेळी झालेल्या लाठीमारात तब्बल 100 भाविक जखमी झाले आहेत.
तीन भाविकांचा मृत्यू : बन्नी उत्सवात झालेल्या लाठीमारात अनेक भाविक जखमी झाले आहेत. हा उत्सव पाहण्यासाठी झाडावर चढलेल्या भाविकांचा फांदी तुटून अपघात झाला. यावेळी झाडाची फांदी अंगावर पडून गणेश ( वय 19 राहणार अस्पारी ) आणि रामजनेयुलू ( वय 54 वर्षे ) यांचा मृत्यू झाला. तर कुरुवा प्रकाश यांचा श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला आहे. बन्नी उत्सवात हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली होती. पोलीस विभागाच्या वतीनं सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीनं ही निगराणी करण्यात आली. मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. या घटनेत तीन जणांची प्रकृती गंभीर असून जखमींना आलरुच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा :