नवी दिल्ली BJP New Slogan : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं नवं स्लोगन निश्चित करण्यात आलंय.
भाजपाची नवी घोषणा : गुरुवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी 'तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार' ही नवीन घोषणा देण्यात आली. पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, सरचिटणीस तरुण चुघ आणि सरचिटणीस सुनील बन्सल उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बैठकीला पक्षाचे सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित होते.
400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य : "भाजपानं आगामी निवडणुकीसाठी एक नारा ठरवला आहे - "तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार". 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे," असं पक्षाच्या एका वरिष्ठ सूत्रानं सांगितलं. पक्षाच्या एका कार्यकर्त्यानुसार, भाजपानं राज्य विधानसभा आणि लोकसभा स्तरावर संयोजक आणि सह-संयोजक देखील निश्चित केले आहेत. "भाजपानं राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सह-संयोजकही ठरवले आहेत. लवकरच पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू होतील," असं सूत्रांनी सांगितलं.
भाजपाचा याआधीचा नारा : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 'अच्छे दिन आनेवाले हैं' असा नारा दिला होता. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष 'फिर एक बार-मोदी सरकार' या घोषणेवर लढला होता. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने या दोन्ही लोकसभा निवडणुका प्रचंड बहुमतानं जिंकल्या होत्या.
हे वाचलंत का :