नवी दिल्ली : ओडिशा विधानसभेमध्ये एका आमदाराने सॅनिटायझर प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुभाष पाणिग्रही असे या आमदाराचे नाव आहे. मंडीसंबंधी आपल्या मागण्यांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप..
राज्याच्या विधान भवनामध्ये आज रणेंद्र प्रताप स्वैन हे सभागृहाला संबोधित करत असतानाच पाणिग्रही यांनी सॅनिटायझर प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संसदीय कार्य मंत्री बिक्रम अरुखा आणि इतर काही आमदारांनी त्यांना तसे करण्यापासून अडवले. यावेळी बोलताना पाणिग्रही यांनी सरकारवर धान्य खरेदीमधील भ्रष्टाचार, टोकन प्रणालीमधील भ्रष्टाचार आणि मंडी प्रणालीमधील इतर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
याशिवाय दुसरा पर्याय नव्हता..
यापूर्वीही पाणिग्रही यांनी शेतकऱ्यांप्रती सरकारची उदासीनता असल्याचा आरोप करत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले, की सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
हेही वाचा : कर्नाटक सेक्स सीडी प्रकरण : एसआयटीमार्फत पाच जणांना अटक