नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे देशातील डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. परंतु या अत्यंत कठीण परिस्थितही रुग्णांच्या आरोग्यकडे लक्ष देण्यासोबतच त्यांच्या मनोरंजनाचीही काळजी डॉक्टरांच्यावतीने घेतली जात आहे. डॉक्टरांकडून कोरोनाबाधित 93 वर्षींय आजोबांचा वाढदिवस रुग्णालयात साजरा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
ओडिशाच्या बालांगीरमधील केआयएमएस कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित गोपाबंधू मिश्रा यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचा वाढदिवस रुग्णालयातील डॉक्टरांकडून साजरा करण्यात आला. ऐवढेच नव्हे तर आयसीयूमध्ये वाढदिवसाची छान सजावट देखील केली होती. डॉक्टारांनी दिलेले खास बर्थ डे सरप्राईज पाहून गोपाबंधू मिश्रा यांच्यावर चेहऱ्यावर हास्य फुलले.
धीर गंभीर वातावरण असणाऱ्या कोरोना वार्डातही वाढदिवसाच्या 'सेलिब्रेशन'मुळे चैतन्य फुलले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने लोकांचे मन जिंकलं आहे. कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात सकारात्मक ऊर्जा या व्हिडिओमधून मिळतेय. देवदूतासमान डॉक्टरांना लोकं सलाम करीत आहेत.