कोट्टायम : केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका ( Bird Flu ) वाढला आहे. जिल्ह्यातील अर्पुकारा आणि थलायझम पंचायतींमध्ये फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला. अधिकाऱ्यांना बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघात सुमारे 8,000 बदके, कोंबडी आणि इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहे. फ्लूच्या प्रादुर्भावाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पी.के.जयश्री ( Collectorate P K Jayshree ) यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ( Bird Flu Outbreak Reported In Two Villages In Kerala )
अंडी,मांस विक्रीवर बंदी : पीके जयश्री यांनी स्थानिक संस्था आणि पशुसंवर्धन विभागाला बाधित क्षेत्राच्या एक किमी परिसरातील पक्षी मारण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पीआरडीच्या म्हणण्यानुसार हा परिसर फ्लूमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच कोंबडी, बदक, इतर पाळीव पक्षी, अंडी, मांस आणि खत यांच्या विक्रीवर 13 डिसेंबरपासून तीन दिवस बर्ड फ्लूग्रस्त भागाच्या 10 किमी परिसरीत बंदी घालण्यात आली आहे.
बर्ड फ्लूचा एक रुग्ण आढळला : जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, रोगाच्या केंद्रापासून 10 किमीच्या परिसरातील 19 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोंबडी, बदक किंवा इतर पाळीव पक्ष्यांचा असामान्य मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास त्याची तक्रार जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात करण्यात यावी. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थलांतरित आणि सागरी पक्षी हे जिल्ह्य़ात आढळणाऱ्या H5N1 जातीचे वाहक आहेत. तसेच आज बर्ड फ्लूचा एक रुग्ण आढळून आला आहे.
पक्षी मारण्यासाठी पथकांची स्थापना : अर्पुकारा येथील बदक फार्म आणि थलायझम येथील ब्रॉयलर चिकन फार्ममध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर, नमुने भोपाळमधील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. बाधित भागातील पंचायतींमध्ये पक्षी मारण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे.