सारण (बिहार) : बिहारमध्ये दारूबंदी असूनही बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूने (Bihar Poisonous Liquor Tragedy) लोक हादरले आहेत. सारणनंतर आता सिवानमध्येही पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यामध्ये छपरा बनावट दारू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट दारू इतर कुठूनही आली नसून ती पोलीस ठाण्यातून गायब झाली आहे! (spirit stolen from police station). याबाबतची माहिती आता राज्य सरकारपर्यंत पोहोचली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
छपरा दारुप्रकरणी मोठा खुलासा : मशरक पोलीस ठाण्यात उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात रॉ स्पिरीट जप्त करून नष्ट करण्यासाठी ठेवला होता. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो नष्ट करण्याचा विसर पडला. या स्पिरीटमधून मोठ्या प्रमाणात स्पिरीट गायब झाल्याचे आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ड्रमचे झाकण गायब असून, ड्रममधून स्पिरीट गायब आहे. पोलीस ठाण्यातूनच ही दारू गायब झाली असून, त्यामुळे सातत्याने लोकांचे बळी जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्पिरीट पोलीस ठाण्यातून बेपत्ता : पीडित महिलांनी ही दारू मशरक मार्केटमधूनच विकत घेतल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारचे उच्चस्तरीय पथक छपरा येथे पोहोचले. त्यांनी पोलिस ठाण्यात ठेवलेल्या दारूच्या साठ्याचा आढावा घेतला. तेथे त्यांना मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली. जेथे उघड्यावर दारू ठेवण्यात आली होती, तेथील अनेक ड्रम गायब असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहआयुक्त कृष्णा पासवान आणि उत्पादन विभागाचे उपसचिव निरंजन कुमार मसरख येथे पोहोचले आहेत.
दोन वॉचमन संशयाच्या भोवऱ्यात : अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, या पोलीस ठाण्याचे दोन वॉचमन संशयाच्या भोवऱ्यात असून, जदु मोड परिसरातील चौकीदाराला निलंबित करण्यात आले आहे. जदु मोडजवळ आणि संबंधित भागात बनावट दारूमुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्व पोलीस ठाण्यात तपास सुरू : याला पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा म्हणा किंवा गुन्हेगारी निष्काळजीपणा म्हणा, पण कुठेतरी ही मोठी चूक आहे. यानंतर शासनाने सर्व पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या दारूचा तपास सुरू केला आहे. सध्या या संपूर्ण घटनेनंतर डीएम आणि एसपींनी सांगितले आहे की, यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. पोलीस ठाण्यात ठेवलेल्या दारूमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली तर अनेक अधिकारी यात अडकणार आहेत. मात्र 2008 पासून आतापर्यंत जप्त केलेली विषारी दारू अशी उघड्यावर का ठेवण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे.
छपरा विषारी दारू प्रकरण : बिहारच्या छपरामध्ये विषारी दारूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. संशयास्पद विषारी द्रव्य प्यायल्याने आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू सारणच्या मशरक, मधौरा, इसुआपूर आणि अमनौर ब्लॉकमध्येच झाले आहेत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी 153 तस्करांना अटक केली आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णांवर छापरा सदर रुग्णालय, पीएमसीएच आणि एनएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत.
सिवानमध्येही मृत्यू : सारणच्या छपरामध्ये विषारी दारूचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला आहे. दरम्यान, सिवानमधून पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांच्या मृत्यूचे कारण विषारी दारूचे सेवन असल्याचेही सांगितले जात आहे. हे प्रकरण भगवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रह्मस्थान गावाशी संबंधित आहे.