छपरा (बिहार) Bihar Boat Accident : बिहारमधील छपरामधून बोट अपघाताची दुर्देवी घटना समोर आली आहे. येथील शरयू नदीत प्रवाशांनी भरलेली एक बोट उलटली. या घटनेत आतापर्यंत ४ जणांचे मृतदेह सापडले असून, अजूनही १४ जण बेपत्ता आहेत. अंधारामुळे अनेकांचा शोध लावण्यात अडचण येत आहे. अंधारामुळे बचावकार्यातही अडचणी येत आहेत. मांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मथियार येथे ही घटना घडली. बोटीच्या अपघातानंतर परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
स्थानिकांनी बचाव केला : दियारा परिसरातील शेतकरी व मजूर शेतात काम करण्यासाठी नदीपलीकडे गेले होते. ते सायंकाळी बोटीनं परतत होते. दरम्यान ही बोट उलटली. बोट पलटी झाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोक आणि बोटीवरील लोकांचे नातेवाईक नदीच्या दिशेने धावले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. यानंतर पोलीस आणि प्रशासनाला अपघाताची माहिती देण्यात आली. प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचं पथक पोहोचेपर्यंत स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले होते. नदीतून अनेकांची सुटका करण्यात आली आहे.
नदीत बुडालेल्या लोकांचा शोध सुरू : सध्या डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. सरयू नदीत मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अजूनही सुमारे १४ लोक बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचं पथकही घटनास्थळी हजर आहे. या सोबतच एसडीआरएफच्या टीमनंही बचावकार्य सुरू केलंय. नदीत बुडालेल्या लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. फूल कुमारी देवी, तारा देवी, रमिता कुमारी आणि पिंकी कुमारी असं मृत व्यक्तींची ओळख आहे.
हेही वाचा :