रोहतास (बिहार) : बिहारमधील रोहतास येथे भीषण रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील शिवसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बुधवारी पहाटे ३ वाजता हा अपघात घडला.
सात जणांचा जागीच मृत्यू झाला : झालं असं की, भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओच्या चालकाचं अचानक गाडीवरील नियंत्रण सुटलं. गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, घटनास्थळी एकच हाहाकार माजला. अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मरण पावलेले सर्व लोक कैमूर जिल्ह्यातील कुडारी गावाचे रहिवासी होते. ते बोधगयाहून कैमूरला परतत होते.
'आम्ही बोधगयाहून येत होतो. वाटेत वाहन पुढं जात होतं की, उभं होतं ते कळलं नाही. सात जणांचा मृत्यू झाला. आम्ही सर्व एकाच कुटुंबातील आहोत. - सुदेश शर्मा, जखमी
मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले : अपघातानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे पोहचून जखमींना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल केलं. तिथं प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी सर्वांना पुढील उपचारासाठी हायल सेंटरमध्ये पाठवलं आहे. घटनास्थळी पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
आम्हाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तिथं माहित झालं की, चालक झोपेत असताना त्याने थेट कंटेनरला धडक दिली. वाहनाने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. सात जणांचा मृत्यू झाला आहे. - नरेंद्र पांडे, राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी
हेही वाचा :