भोपाळ : देशभरात सध्या कोरोना लसीसोबत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याच्या बऱ्याच घटना समोर येत आहेत. त्यातच आता मध्य प्रदेशच्या राजधानीत असणाऱ्या हमीदिया रुग्णालयातून तब्बल ८०० रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी कोहेफिजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असू शकतो असा पोलिसांचा अंदाज आहे. कोहेफिजा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज अनिल वाजपायी यांनी याबाबत माहिती दिली.
काँग्रेस नेते पी.सी. शर्मा यांनी रेमडेसिवीर चोरीच्या घटनेवरुन रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येऊन, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
रेमडेसिवीरचा काळाबाजार समोर..
दुसऱ्या एका घटनेत रेमडेसिवीर इंजेक्शन अवैध पद्धतीने विकणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. हा तरुण एक इंजेक्शन तब्बल २२ हजार रुपयांना विकत होता.
हमीदिया रुग्णालय यापूर्वीही वादात..
यापूर्वीही हमीदिया रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. एका मुस्लिम महिलेचा मृतदेह रुग्णालयाने चक्क हिंदू कुटुंबीयांना दिला होता. जेव्हा हे मुस्लिम कुटुंबीय या महिलेचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात गेले, तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार समजला. तोपर्यंत हिंदू कुटुंबीयांनी त्यांना मिळालेल्या मृतदेहाचे अंत्यसंस्कारही करुन टाकले होते.
हेही वाचा : देशात कोरोना लसीची कमतरता नाही - केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन