बाली (राजस्थान) - लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. इतर राज्यात कामासाठी आलेले मजूर अडकून पडले आहेत. हे स्थलांतरीत मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा चालत घर जवळ करत आहे. अशाच प्रकारे मुंबईत काम करणारा मुळचा राजस्थानचा पाबूराम राईका गेल्या १७ एप्रिलला चालत घरी जायला निघाला. त्याच्या मालकाने त्याला पगार देण्यासही नकार दिला. सतत सात दिवस कधी रस्त्याने तर कधी रेल्वे रुळावरून तो चालत होता.
चालत असताना पाबुरामची खाण्या-पिण्याची व्यवस्था होत होती. मजलदरमजल करत तो अहमदाबादला पोहोचला. मात्र, त्याच्या पायांची अवस्था फार वाईट झाली होती. मृत पाबूरामचा एक भाऊ अहमदाबादला मिठाईच्या दुकानात काम करतो. त्याला पाबुरामबद्दल माहिती मिळाली. त्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र २० दिवस उपचारानंतरही पाबुरामचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
अधिकारी डॉ. राजेंद्र पुनामिया यांनी सांगितले की, पायी चालल्यामुळे त्याची तब्येत खूप खराब झाली होती. अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयातून पाबुरामचा मृतदेह जोबा येथे नेण्यात आला. छोगारामने सांगितले की, प्रशासनाने पाबुरामचा मृतदेह घरी नेण्याची परवानगी दिली नाही आणि येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
मृत पाबुरामचे गेल्यावर्षीच लग्न झाले होते. तो डोंबीवलीत मिठाईच्या दुकानात काम करायचा. त्याचे दोन्ही भाऊ महाराष्ट्रात अडकून पडले आहेत.