चमोली (उत्तराखंड) - ग्रीन हिमालय-क्लीन हिमालय मिशन अंतर्गत पर्यावरणाचा संदेश देत सोमेश पवारने भारताचे शेवटचे टोक असलेल्या माणा या गावापासून कन्याकुमारीपर्यंत सायकल यात्रा सुरू केली आहे. सोमेश माणाहून कन्याकुमारीपर्यंतच्या 4035 किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत. जवळपास 40 दिवसांत ते ही यात्रा पूर्ण करणार आहेत.
पर्यावरण रक्षणाच्या जागृतीसाठी यात्रा
सोमेश यांनी दृढ इच्छाशक्ती आणि धाडसाने कडाक्याच्या थंडीत बद्रीनाथच्या माणा या गावापासून सायकल यात्रेला सुरुवात केली. ग्रीन हिमालय-क्लीन हिमालय व पर्यावरण रक्षणाबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी त्यांनी सायकल यात्रा सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरीर सुदृढ ठेवण्यासाठी तरुणांना जागरुक करण्याच्या हेतूने त्यांनी हा मार्ग निवडला आहे. बद्रीनाथ मंदिराचे धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल यांनी हिरवा झेंडा दाखवून सोमेश पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.