नवी दिल्ली - कमलेश भट्ट मृतदेह प्रकरण हाताळताना भारतीय प्रशासनात सहानभुतीचा अभाव दिसून येत आहे. भट्ट कुटुंबीय कमलेशचा मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत. मात्र, अजूनही त्यांना मृतदेह मिळालाा नाही. कमलेश भट्ट याचा दुबईत हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तेथून त्याचा मृतदेह विमानाने भारतात आणण्यात आला मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रशासनाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे मृतदेह पुन्हा दुबईला पाठविण्यात आला आहे.
23 वर्षीय कमलेश भट्ट मूळचा उत्तराखंड राज्यातील तेहरी गढवाल येथे राहणार होता. मात्र, हृद्यविकारच्या झटक्याने 16 एप्रिलला अबुधाबीत त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मालवाहू विमानाने भारतात आणण्यात आला होता. मात्र, मृतदेह माघारी पाठविण्यात आल्याने भट्ट कुटुंबीय आणखीनच दु:खात बुडाले आहे. तसेच प्रशासनाच्या नियमांमुळे संभ्रमात सापडले आहेत.
कमलेश याच्या मृतदेहाबरोबर इतर दोन भारतीय नागरिकांचे मृतदेहही दुबईला माघारी पाठविण्यात आले आहेत. 23 एप्रिलला इतिहाद एअरवेजच्या EY-9809 या फ्लाईटने मृतदेह माघारी पाठविण्यात आले. ब्युरो ऑफ इमिग्रेशनने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचे भट्ट कुटुंबीयांनी म्हटले आहे.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसीमुळे मृतदेह भारतात उतरवून घेण्यात येणार नाही, असे आम्हाला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले, असे भट्ट कुटुंबीयांनी सांगितले. मालवाहू विमान विभागातील अधिकाऱ्यांनीही हेच उत्तर दिले. गृहमंत्रालयाच्या नोटीसीची प्रत मागितली असता मला फक्त मंत्रालयातील एक फोन नंबर देण्यात आला, तोही बंद आहे, असे मृत कमलेश भट्ट याच्या नातेवाईकाने सांगितले.
या प्रकारामुळे सरकारामधील दोन मंत्रालयात ताळमेळ नसल्याचे दिसून येते. जर परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह भारतात आणण्यास परवानगी दिली तर इतर मंत्रालय त्यास नकार कसा काय देऊ शकते, असे कमलेशचा नातेवाईक विमलेश भट्ट याने सांगितले. विमलेश आपल्या चुलत भावाचा मृतदेह घेण्यासाठी देहराडूनवरून दिल्लीला आला होता.
कमलेश यांच्या कुटुंबीयांची घडल्या प्रकारामुळे काय अवस्था झाली असेल, हे तुम्ही समजू शकता. तरूण मुलाचा दुबईत मृत्यू होतो. मृतदेह भारतातही आणण्यात येतो. मात्र, मंत्रालयाच्या एका आदेशाने मृतदेह पुन्हा दुबईला माघारी नेला, असे विमलेशने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वाट पाहत असलेल्या कुटुंबीयांना मृतदेह पुन्हा दुबईला माघारी नेला, हे पटवून सांगण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो, असं विमलेश म्हणाला.
आमची काय अवस्था झाली असेल. आम्ही सर्वकाही प्रयत्न केले. मात्र, तरीही कमलेशचा मृतदेह माघारी दुबईला पाठवला. मागील एक आठवड्यापासून काय काय घडत आहे, हे आम्हालाही समजत नाही, असे दु:खी विमलेशने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. कमलेशच्या मृत्यूबाबत दुबईतील भारताच्या दुतावासानेही काही माहिती घेतली नाही, असा आरोप भट्ट कुटुंबीयांनी केला आहे.
ज्या कंपनीने कमलेशला दुबईत नोकरी दिली होती, त्यांचा आम्हाला 17 एप्रिलला फोन आला होता. मात्र, भारतीय दुतावासाकडून आम्हाला कोणताही फोन आला नाही, असे मनिष उनियाल या नातेवाईकाने सांगितले.
सर्व कायदेशीर सोपस्कर पार पाडून कमलेशचा मृतदेह भारतात आणण्याचा आम्ही खुप प्रयत्न केला. यासाठी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांशीही संपर्क साधला. याकामी भारतातील सामाजिक कार्यकर्ते रोशन रौत्री यांनी आम्हाला मोठी मदत केली, असे विमलेशने सांगितले.
ईटीव्ही भारतने केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधण्याच प्रयत्न केला. कमलेशचा मृतदेह भारतात आल्यावर कुटुंबीयांकडे का सोपवण्यात आला नाही, याबाबत माहिती विचारली. अशा परिस्थिती कोणते नियम आणि निर्देशांचे पालन करावे लागते, याची आम्ही चाचपणी करत आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले. भट्ट कुटुंबीयांना आलेली अडचण परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सुत्रांनी सांगितले.