पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बिहारमध्ये मंगळवारपासून भाजपा उमेदवारांच्या प्रचारास सुरवात करणार असून एकूण 18 सभा ते घेणार आहेत. एका दिवसात ते तीन सभा घेणार असल्याची माहिती भाजपा कार्यालयाने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी एकूण 12 सभा घेणार असून त्यातील पहिली सभा 23 ऑक्टोबरला होणार आहे. तर महागठबंधनसाठी राहुल गांधी 23 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये प्रचारसभांना सुरुवात करणार आहेत.
भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, खासदार मनोज तिवारी, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. तर काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शत्रुघ्न सिन्हा आणि इतर काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.