अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात विविध मार्गांनी नागरिकांमध्ये जागरूकता पसरवण्यात येत आहे. आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. पोलिसांनी हिंदू धर्मातील मृत्यूचे देव असलेले यमराज यांनाच कोरोनाबाबत जागरुकता पसरवण्यासाठी सक्रिय केले आहे.
ढोने गावात थेट यमराजाच्या वेशातील नाट्यकर्मी आणि त्यांचा चमू गावात गाडीवरून फिरतोय. पोलिसांनी काढलेल्या या रॅलीमध्ये यमदेव तसेच चित्रगुप्त देखील आहे.
मृत्यूदेवतेच्या वेशभूषेतील हे नाट्यकर्मी नागरिकांना कोरोबाबत खबरदारी घेण्याची शिकवण देत आहेत. तसेच त्यांच्यासोबत कोरोनारूपी दानवाची वेशभूषा परिधान केलेली एक व्यक्ती आहे. या सर्वांनी पथनाट्ये करून समाज जागृती केली.
नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे,असे आवाहन पोलीस यंत्रणेच्या वतीने करण्यात आले. लोकांनी लॉकडाऊनचे पालन न केल्यास ते थेट यमराजाला निमंत्रण देत असल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर रेड्डी यांनी सांगितले .
दरम्यान, आंध्रप्रदेशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांची फौज देखील तैनात आहे. त्यांची संख्या जवळपास तीन लाखाच्या जवळपास आहे. मात्र राज्य प्रशासन सध्या तबलिगी कार्यक्रमातून परतलेल्या ४०० संशयितांची समस्या सोडवण्याच्या तणावाखाली आहे.