गुवाहटी - आसामध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी आज (शनिवारी) जाहीर झाली. यादीमध्ये नाव न आल्याने सोनीतपूर जिल्ह्यातील एका ५० वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. ज्यांचे यादीमध्ये नाव आले आहे. त्यांचे भारताचे नागरिकत्त्व सिद्ध झाले आहे. तर या यादीतून १९ लाखांपेक्षा जास्त लोकांना वगळण्यात आले आहे. त्यांच्यावर नागरिकत्त्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा - पत्नीचे भारतीयत्व सिद्ध न होण्याच्या भीतीने पतीची आत्महत्या
राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी यादीमुळे आसाम राज्यात स्थलांतरीत नागरिक कोण आहेत ते समजणार आहे. भारतीय नागरिकत्त्वाच्या यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना यातून वगळण्यात आले आहे. ज्या लोकांचा या यादीमध्ये समावेश झाला नाही, त्यांना नागरिकत्त्व सिद्ध करण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी अधिकारी प्रतीक हजेला यांनी या बाबतची माहिती दिली.
हेही वाचा - आसाम एनआरसी : अफवांवर विश्वास ठेऊ नका, गृहमंत्रालयाचे नागरिकांना आवाहन
ज्या लोकांची नावे यादीमध्ये नाहीत त्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. भारतीय नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी यादीत नाव नसणाऱ्यांना संधी दिली जाईल, तसेच कायदेशीर प्रक्रियेनंतरच यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री सोनोवाल यांनी जनतेला केले आहे.
हेही वाचा - आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम यादी जाहीर; १९ लाख लोकांना वगळले
कोणतीही अफवा पसरु नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. कोणी अफवा पसरवत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आसामचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे. समाजमाध्यमांद्वारे लोकांना जागरुक करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आसाम राज्यामध्ये अनेक बांगलादेशीचे अनधिकृत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे राज्यामध्ये अनेक वेळा हिंसाचार घडून आला आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी अनेक बांग्लादेशी भारतामध्ये आश्रयाला आले. त्यामुळे स्थानिक आणि स्थलांतरीत नागरिकांमध्ये हिंसाचार झाला आहे.