लखनऊ - उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यामध्ये एका तरुणीचा खून करून शरीराचे तुकडे बॅगमध्ये भरून ठेवलेल्या अवस्थेत सापडले आहेत. बॅगमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अवयव भरून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. तरुणीची ओळख पटली नसून दोन दिवसांपूर्वीचा मृतदेह असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सफिदाबाद येथे एका बंद कारखान्याच्या बाहेर कोणीतरी एक बॅग आणून ठेवली होती. या संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. बॅग उघडली असता त्यामध्ये अंदाजे 20 वर्षाच्या तरुणीच्या शरीराचे तुकडे आढळून आले, असे पोलीस अधिकारी सुशिल कुमार सिंह यांनी सांगितले.
कारखान्यापासून जवळच आणखी काही पिशव्यांमध्ये तरुणीचे शीर आणि एक पाय ठेवल्याचे आढळून आले. हा मृतदेह दोन दिवसांपूर्वीचा असावा. बॅगमधून घाण वास येत असल्याने स्थानिक नागरिकांचे बॅगकडे लक्ष गेले. या अज्ञात तरुणीचा दुसऱ्याच ठिकाणी खून करण्यात आला असावा. त्यानंतर मृतदेह कारखान्याबाहेर आणून ठेवला असावा, असे पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले.