अमरावती - आंध्रप्रदेशमधील कडपा ग्रामीण रुग्णालयात एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तिने सहा आठवड्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म दिला होता. तिने आपल्या मुलांना मनभरून पाहिले सुद्धा नव्हते. त्यातच दोन्ही मुलांना पोरके करून ती निघून गेली. त्यामुळे नातेवाईक हळहळ व्यक्त करीत आहेत.
ती चपडू मंडळ येथील रहिवासी होती. तिने सहा आठवड्यांपूर्वीच जुळ्या मुलांना जन्म दिला होता. ती प्रसूतीनंतर होणाऱ्या समस्यांमुळे ग्रासलेली होती. त्यातच तिला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिची प्रकृती अधिकच गंभीर झाली. तिच्यावर कडपा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत घेऊन गेले. मात्र, ग्रामस्थांनी त्यांच्या शिवारात अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे कडपाच्या बाहेर नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचा भाऊ आणि पती सौदीमध्ये राहतो, तर दुसरा भाऊ क्वारंटाइनमध्ये आहे. त्यामुळे तिच्या अंत्यसंस्काराला कोणीही उपस्थित राहू शकले नाही.