श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) - जिल्ह्यातील एका 50 वर्षीय महिलेने श्रीकाकुलम पोलीस ठाण्यात सॅनिटायझर प्यायल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या महिलेची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे सांगितले. ईरम्मा असे या महिलेचे नाव असून ती कोटाबोम्माली मंडलमधील तारली बोड्डापडू या गावची रहिवासी आहे. तिला श्रीकाकुलम सरकारी रुग्णालयात ठेवले आहे. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही महिला तिच्या शेजारील एका महिलेची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. तीन महिन्यांपासून या दोघींमध्ये वादावादी सुरू आहे. महिलेचा मुलगा चिरंजीवी याने शेजारील महिलेने आपल्या बहिणीच्या अंगावर वाळू फेकल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या आईने शेजारणी बरोबर भांडण सुरू केले आणि त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर ईरम्मा तिची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार देऊन आपल्या आईला शिवीगाळ केल्यामुळे तिने सॅनीटायझर प्यायल्याचे चिरंजीवी यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकाराची एक वेगळी बाजू कोटाबोम्माली येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण राव यांच्याकडून समजली आहे.
‘ईरम्मा हिच्या घराजवळ एक दलित महिला राहते. ईरम्माचा मुलगा चिरंजीवी हा गावातील स्वघोषित पुढारी आहे. त्याने या शेजारच्या महिलेला अनेकदा त्रास दिला असून तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. यामुळे त्या महिलेने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली होती. यानंतर चिरंजीवी याला पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली होती. मात्र, यानंतरही संबंधित महिलेला त्रास देण्याचा प्रकार सुरूच राहिला. यानंतर ईरम्मा यांच्या मुलीवर वाळू फेकण्याचा प्रकार घडला. यानंतर दोन्ही महिलांची जोरदार शाब्दिक वादावादी झाली. या प्रकारानंतर ईरम्मा यांची शेजारीण पुन्हा त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. तेव्हा आम्ही चौकशीसाठी ईरम्मा आणि तिच्या मुलाला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले. सुरुवातीला त्यांनी आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर ते पोलीस ठाण्यात आले,’ असे राव म्हणाले.
गुरुवारी ईरम्माने पोलीस ठाण्यात येऊन आमच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने तिच्या सोबत आणलेले सॅनिटायझर प्राशन केले आम्ही ताबडतोब त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आणि नंतर श्रीकाकुलम सरकारी रुग्णालयात ही त्यांना नेले उपचारानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राव यांनी दिली आहे.
राव यांच्या म्हणण्यानुसार, ईरम्मा आणि तिच्या मुलाचा त्यांच्यावर दाखल झालेल्या प्रकरणातून सुटण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणलेला हा डाव होता. ईरम्माने पोलीस ठाण्यात आल्यानंतर आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली की, आम्ही तिची तक्रार लिहून घेत नाही आहोत, असे ते म्हणाले.