नवी दिल्ली - पाकिस्तानने आपल्या बाजूने करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू केला. यानंतर भारताने शनिवारी सांगितले की, कोरोनाचे प्रोटोकॉल आणि काही निर्बंध शिथिल केल्यानंतर भारत गुरदासपुरातील डेरा बाबा नानक साहिब आणि पाकिस्तानच्या करतारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबला जोडणारा 4.7 किलोमीटर लांबीचा प्रवास पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेईल.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्ही गृह मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. करतारपूर कॉरिडॉरला पुन्हा सुरू करण्याबाबत कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली. यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2019मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार भारतीय पर्यटकांना पहाटेपासून संध्याकाळपर्यंत करतारपूर गुरुद्वारा भेट देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
करतारपूर कॉरिडॉर सुरु करण्यात आला, तेव्हा ऑक्टोबर 2019मध्ये भारत-पाकिस्तान द्विपक्षीय करार करण्यात आला. त्यात दोन्ही बाजूंनी बुधी-रवी वाहिनीवर पूल बांधण्यासह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, असा निर्णय घेण्यात आला होता, असेही या निवेदनात म्हटले आहे. मात्र, पुलाचे बांधकाम पाकिस्तानच्या बाजूने प्रलंबित आहे.
कोरोनाच्या महासंकटामुळे भारत सरकारने मार्चमध्ये करतारपूर कॉरिडॉर बंद केला होता. तर, पाकिस्तान सरकारनेही पाकिस्तानी नागरिकांना करतारपूर कॉरिडोरमधून प्रवास करण्यास बंदी घातली होती.
जून 2019मध्ये महाराजा रणजितसिंग यांच्या पुण्यतिथीच्या स्मृतीदिनानिमित्ताने हा कॉरिडॉर पुन्हा उघडण्यात आला होता. मात्र, भारताने पाकिस्तानच्या या प्रस्तावाला नकार दिला होता.