नवी दिल्ली - जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओने ओडिशा सरकारच्या कार्यक्षम कोविड - 19 व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. राज्यात मोठ्या संख्येने परप्रांतात गेलेले लोक आणि कामगार परत आले तसेच, अॅम्फान चक्रीवादळालाही राज्याला तोंड द्यावे लागले. तरीही राज्याने दोन्ही आपत्तींचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले, असे डब्ल्यूएचओच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे. 'प्रशासनापासून समाजाची लवचिकता' (From governance to community resilience) असे या लेखाचे शीर्षक आहे.
या लेखामध्ये ओडिशा सरकार आणि लोकांनी कोविड-19 रुग्णांचे आणि नैसर्गिक आपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन केले, असे म्हणत यात राज्याचे कौतुक केले आहे. 'सामाजिक अंतराचे पालन करीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे आव्हानात्मक होते. परंतु आपत्ती व्यवस्थापनातील राज्याच्या अनुभवामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत झाली. पंचायती राज संस्था आणि समुदाय यांच्यावर आधारित योजना तयार करून एकमेकांच्या सहकार्याने केलेल्या प्रभावी शासन कारभारामुळे राज्य सक्षमपणे या समस्या हाताळू शकले,' असे या लेखात म्हटले आहे.
हेही वाचा - हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना; योगी आदित्यनाथांची घोषणा
ओडिशातील जागतिक आरोग्य संघटनेच्या उपप्रादेशिक पथकाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. निहार रे यांचेही कौतुक झाले. त्यांच्या प्रयत्नांनीच कालिंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि एसयूएम रुग्णालयाच्या मदतीने एका आठवड्यात देशातील पहिले 1000 खाटांचे मॉडेल कोविड रुग्णालय स्थापन झाले. हा एक विक्रम ठरला. याच्यापाठोपाठ वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 30 कोविड रुग्णालये स्थापन झाली. यापैकी 17 रुग्णालये शासकीय, खाजगी रुग्णालये आणि वित्त महामंडळांसोबत त्रिपक्षीय करारावर कार्यरत आहेत. अशाच प्रकारे मे 2020 पर्यंत कोविड रुग्णांसाठी विशेष सुविधा देणाऱ्या 22,340 खाटांची सोय राज्यात झाली. यासह राज्याने अनेक पातळ्यांवर मोठी कार्यतत्परता दाखवत या महामारीच्या संकटाचा यशस्वीपणे सामना केला. प्रवास करून आलेल्या व्यक्तींसाठी, परप्रांतीयांसाठी तसेच, इतर राज्यांतून येणाऱ्या ओडिशातील नागरिकांसाठी 18,000 हून अधिक तात्पुरती वैद्यकीय शिबिरे (टीएमसी) लावली गेली.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. याशिवाय मिशन शक्ती अंतर्गत राज्याने बचत गटांना (स्वयंसहाय्यता गट) प्रशिक्षण दिले. अहवालात असे म्हटले आहे की, 28 जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत राज्यात सर्वात कमी मृत्यू किंवा मृत्यूचे प्रमाण आहे.
दरम्यान, 30 सप्टेंबरपर्यंत राज्यात, 33,367 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1.8 लाखांहून अधिक रुग्ण आधीच बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 828 मृत्यूंची नोंद झाली आहे.
हेही वाचा - रिपब्लिकन पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवणार - रामदास आठवले