लेह : लदाखच्या सीमेपासून केवळ २०० ते ३०० मीटर अंतरावर चिनी सैन्य तैनात करण्यात आले आहे. लष्करातील सूत्रांनी प्रसिद्ध केलेल्या काही छायाचित्रांमध्ये चीनचे सैनिक हातात विविध शस्त्रे घेऊन उभे असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने एका टोकाला कोयत्याप्रमाणे शस्त्र लावलेल्या काठ्यांचा समावेश आहे. तसेच, या सैनिकांच्या खांद्यावर बंदुकाही दिसून येत आहेत.
यापूर्वी गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या वीस जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते. या झटापटीवेळी चिनी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी बंदुकीचा वापर न करता, चक्क लोखंडी रॉड तसेच खिळे लावलेल्या काठ्यांचा वापर केला होता. यानंतर काही दिवसांपूर्वीच पँगॉंग लेकच्या परिसरात पुन्हा चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
सात सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैनिक सीमेवरून मागे हटण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना, चिनी सैन्याने लष्कराला चिथावणी देण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. यानंतर चीनने भारताचे सैनिक आपल्या हद्दीत शिरल्याचा कांगावाही केला. त्यातच आता सीमेवरील ही सशस्त्र सैनिकांची छायाचित्रे समोर आली आहेत. 'डीएस्केलेशन' प्रक्रियेबाबत दोन्ही देशांमध्ये ठराव झाला असूनही, सीमेपासून केवळ २००-३०० मीटरवर चीनने आपले सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळेच, चीनी लष्कर भारताला वारंवार चिथावणी देत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : भारतीय जवानांना चिथावणी देण्यासाठी चीनी सैन्याचा हवेत गोळीबार; लष्कराची माहिती